आगडगाव नगर शहरापासून 20 किलोमीटर अंतरावर आहे. नगरहून जाताना बुऱ्हाणनगर, कापूरवाडीवरून आगडगावला जाता येते. तसेच चांदबिबीच्या महालापासून 8 किलोमीटरवर अंतरावर हे गाव आहे. तेथे काळ भैरवनातांचे मंदिर अत्यंत पुरातन आहे. त्यावर शिलालेख किंवा पुरातन लिखित सामुग्री नाही. मात्र भव्य दगडांनी बांधलेले हे मंदिर अफाट शक्ती असलेल्या व्यक्ती किंवा राक्षसांकडून बांधले असावे, हे मंदिर पाहताक्षणीच स्पष्ट होते. कारण सुमारे आठ ते दहा फूट लांबीच्या अखंड दगडांचे खांब, मोठ-मोठ्या थापशिळी याची साक्ष देतात. देवस्थानाजवळ निःस्पृह बाबांची गादी आहे. बाबा स्वर्गवासी झाल्यानंतर त्यांची समाधी मंदिर परिसरात बांधण्याची पद्धत आहे. समाधीवर पादुका लावलेल्या असतात. अशा 24 पादुका तेथे आहेत. यावरून हे देवस्थान 24 पिढ्यांपूर्वीपासून असावे, असा अंदाज येतो.
ंदिराच्या गाभाऱ्यात काळ भैरवनाथ व जोगेश्वरी मातेच्या मूर्ती आहेत. दगडी घडीव व स्थानबद्ध या मूर्ती कधीही हलविता येत नाहीत. बाहेर सभामंडपीय मंदिरात कासवाची मूर्ती आहे. मंदिराच्या खांबांवर नागाचे चित्र कोरलेले आहे. या ठिकाणी सर्पदंश झालेल्या व्यक्तिला लिंबाच्या पाल्यात ठेवल्यास सापाचे विष उतरते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर तीन राक्षसांची मुंडकी आहेत. आगडमल, देवमल व रतडमल अशी त्यांची नावे होती. या राक्षसांनी एकाच रात्रीत देवाच्या आज्ञेवरून हे मंदिर बांधले, अशी आख्यायिका आहे.
शेजारीच लिंबाचा मोठा वृक्ष आहे. त्यास विष्णू असे संबोधले जाते. या झाडाखाली उभे राहून अनेक भाविक देवाला नवस करतात. या झाडाचा पाला कडू लागत नाही आणि बहर येतो; परंतु लिंबोळी कधीच येत नाही. भैरवनाथ देवस्थानाजवळ चैत्रामध्ये यात्रा असते. या वेळी गंगेवरून कावडीने पाणी आणून देवाला स्नान घातले जाते. देवाच्या मानाच्या काठ्यांची या वेळी भव्य मिरवणूक होते. शोभेचे दारुकाम होते. काळ भैरवनाथांचा जन्मसोहळा काही आगळा-वेगळा असतो. या दिवशी दिवसभर भंडारा कार्यक्रम होऊन रात्री बारा वाजता जन्मसोहळा होतो. भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम या वेळी होतात. गावातील युवकांनी पुढाकार घेऊन तेथे विकासकामे सुरू केले आहेत. या देवस्थानावर आधारीत "शिवअवतार काळ भैरव' हा मराठी चित्रपटही तयार करण्यात आला आहे. काळ भैरवनाथ जन्माची कथा काशीखंडात सर्वश्रुत आहे. ब्रह्म व विष्णूचे गर्वहरण करण्यासाठी भगवान श्री शंकराने आपल्या डाव्या बाहुतून भैरवनाथांची उत्पत्ती केली आणि भैरवनातांनी दोन्ही देवांचे गर्व हरण केले. त्यानंतर दंडकारण्यात असलेल्या ऋषिमुनींना त्रास देणाऱ्या राक्षसांचा संहार करण्याची जबाबदारी शंकराने भैरवनाथांवर टाकली. त्याप्रमाणे ते दंडकारण्यातून सोनारीकडे जात होते. सोनारी हे उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यातील गाव. तेथेही भैरवनाथांचे भव्य मंदिर आहे. सोनारीकडे जात असताना ते आगडगाव इथे थांबले. तेव्हापासून या ठिकाणी देवस्थान झाले.
भूताची यात्रा ः
भूत म्हटले की माणसांच्या अंगाला काटा फुटतो. शहारे उठतात; परंतु भुताची यात्रा हे आगडगावचे वैशिष्ट्य. महाराष्ट्रात अशी एकमेव ही यात्रा प्रसिद्ध आहे. काही राक्षसही भैरवनाथांचे भक्त होते. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी रात्री (सोमवारी रात्री) राक्षसांनी दर्शनाला यावे, असे देवाने वर दिल्याने त्यांची यात्रा भरते, असे सांगितले जाते. एकदा गावातील तेली गोपीनाथ कर्पे हे यात्रेच्या दिवशी आपली तेलाची घागर मंदिराजवळील दीपमाळीजवळ विसरले. त्यांच्या हे सोमवारी रात्री लक्षात आले. ते मंदिराकडे आले, तेव्हा त्यांना तेथे सर्व भुते नाचताना दिसले ते घाबरले; परंतु देवाने त्याला दर्शन देऊन ती घागर आणून दिली व ही हकिगत कुणालाही सांगू नकोस, असे सांगितले. कर्पे यांनी हे बऱ्याच दिवस मनातच ठेवले; परंतु नंतर हा प्रकार ग्रामस्थांना सांगितला. त्यानंतर लगेचच त्यांचा मृत्यू झाला. ही कथा ग्रामस्थांबरोबरच गोपीनाथ कर्पे यांचे पणतू कोंडिबा कर्पे अद्यापही सांगतात.
भुतं खरंच येतात का? या शंका समाधानासाठी 1950 च्या दरम्यान गावातील काही युवकांनी सोमवारी रात्री म्हणजेच भुताच्या यात्रेच्या दिवशी तेथे भजन करण्याचे ठरविले. मंदिरात भजन सुरू करण्याच्या वेळेस त्यांचा पखवाद फुटला. तसेच मंदिरात वारा येण्यास विशेष जागा नसतानाही त्यांची बत्ती विझली. त्यामुळे काहीतरी चमत्कार आहे, असे समजून ते युवक गावात परतले. दुसरा प्रकार असाच झाला. गावात 1995 च्या दरम्यान पाणलोट विकास कामे सुरू होती. या वेळी पाणलोट विकास संस्थेच्या काही युवकांनी भुताच्या यात्रेच्या दिवशी तेथे चित्रपट दाखविण्याचे नियोजन केले; परंतु चित्रपट सुरू करतानाच वीज गेली. त्यामुळे ते घाबरले व गावात पळाले. 2004 मध्ये महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. त्यामुळे शासनाने जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या. ही छावणी देवस्थान परिसरात होती. त्यावेळी काही युवकांनी ही यात्रा पाहण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना ऐन बारा वाजण्याच्या दरम्यान झोपा लागल्या. या प्रकारांमुळे देवाची परीक्षा कुणी पाहत नाहीत. कारण तसे केल्यास गावावर संकटे येतील, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
No comments:
Post a Comment